हू किल्ड उमर फारूक ( र. )???
माझ्या समूहाचे सर्वात मोठे अरिष्ट संपत्ती आहे, असे प्रेषित मुहम्मद यांनी म्हटले आहे.
आणि म्हणूनच इस्लाम आणि माणसाच्या दरम्यान सर्वांत मोठा अडसर संपत्तीची लालसा होय.
या जगातील सर्व संपत्ती ही कोण्या एकाची मिळकत नसून तिचा सर्वस्व मालक एकमेव अल्लाह आहे आणि त्याच्याच मर्जीनुसार या संपत्तीचा वापर करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य होय.
माझ्याकडे मी स्वतःच्या कष्टाने कमावलेली कोट्यावधीची संपत्ती ही माझी स्वतःच्या मालकीची मुळीच नसून ती केवळ एकमेव अल्लाहच्या मालकीची आहे आणि त्यातील एक पैसा देखील मी आपल्या स्वतःच्या मर्जीने खर्च करू शकत नाही. त्यातील एक एक पैसा अल्लाहच्याच निर्देशानुसार खर्च करावा लागणार, तरच मी मुस्लिम. नसता मला स्वतःला मुस्लिम म्हणून घेण्याचा मुळीच अधिकार नाही, अशी स्पष्ट मांडणी इस्लामी अर्थशास्त्रात आढळते.
आज मात्र धर्म वेगळा आणि धंदा वेगळा, एकीकडे नमाज, रोज़ा, हज, इत्यादी इत्यादी करायचे आणि दुसरीकडे मात्र आपल्या धंद्यात इस्लामी नियम धाब्यावर बसवून पैसा कमवायचा अशी मुस्लिम समाजाची परिस्थिती झाली असल्याने मुस्लिम समाज जगात कोणत्याही काळात व कोणत्याही भागात यशस्वी आणि सुखी होऊ शकतच नाही.
इस्लामचे दुसरे खलिफा उमर फारूक यांचा सुवर्ण काळ.
याच काळात त्यांनी म्हटले की, आता आपल्यात प्रेषित मुहम्मद ( स. ) नाहीत. पहिले खलिफा अबूबकर देखील नाहीत. पुढील काळात मी सुद्धा नसेल. मग सामान्यजन, कष्टकरी, दुर्बललांचे काय होईल? त्यांना दोन घास सुखाचे कसे मिळतील? अंगभर वस्त्र आणि राहायला घर कसे मिळेल? त्यांच्या मूलभूत अधिकारांचे काय होईल? यासाठी माझ्या मृत्यूअगोदरच मला एक कायदा मंजूर करावा लागेल, जेणेकरून या जगात कोणत्याही माणसाला वंचित राहण्याची वेळ येता कामा नये. अर्थातच या जगातील सर्व संपत्तीचे समान व न्यायपूर्ण वाटप करावे, कोणीही अन्न पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादीसारख्या मुलभूत गरजांपासून वंचित होता कामा नये.
"अमीरुल मोमिनीन!! तुम्ही तर आमच्या सम्पत्तीच्या मागे हात धुवून लागला हो !!!" लोकांनी आक्षेप घेतलाच शेवटी. "तुम्हाला आजपर्यंत खूप झेलले हो आम्ही. तुम्ही वीस रकात तरावीहची नमाज पढायला लावली, आम्ही ब्र काढला नाही. तुम्ही महिलांना घरातच नमाज़ पढायला सांगितले, आम्ही ब्र काढला नाही. तुम्ही जे जे सांगितले, ते सगळे आम्ही केले आणि सर्व काही सहन केले. आता मात्र हे अति झाले."
उमर फारूक यांनी या मोठमोठ्या इस्लामी तज्ञांनी घेतलेल्या आक्षेपाचे क़ुरआन व हदीसचे संदर्भ देत समाधान केले आणि सर्व इस्लामी अर्थ शास्त्रज्ञांनी त्यांचा आदेश मान्य केला.
इस्लामी शासनातील संपत्तीचे समान व न्यायपूर्ण वाटप होण्याचे बिल सर्वसंमतीने मंजूर झाले आणि सर्व संपत्तीचे सर्वेक्षण करण्यासाठी मा. अबूझर गफ्फारी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कमेटी गठित करण्यात आली.
याठिकाणी उमर फारूक यांनी अबूझर गफ्फारी यांनाच या सर्वेक्षण कमेटीच्या अध्यक्षपदी का नेमले? यातही उमर फारूक यांच्या फिरासत वा विवेकशक्तीचे दर्शन होते. प्रेषित मुहम्मद ( स. ) अबूझर गफ्फारी यांच्याकडे बोट दाखवून नेहमी म्हणत, खरा मुस्लिम पहायचा असेल तर यांना पहा. याचे कारण असे की, एकदा मा. अबुझर गफ्फारी हे त्यांच्या नोकरासोबत चर्चा करीत बसले होते. त्यांच्या आणि त्यांच्या नोकराच्या अंगावर सारखाच पोषाख होता. ते पाहून एका ज्यूने आश्चर्याने विचारले की, अबुझर, तुमच्यात आणि तुमच्या नोकरात काहीच फरक दिसत का नाही? तुमचा आणि नोकराचा पोषाख सारखाच का ? जो पर्यंत तुम्ही इतरांसाठी देखील तेच पसंत करीत नाही, जे स्वतःकरिता करता, तोपर्यंत तुम्ही मुस्लिम होऊच शकत नाही, असे प्रेषित मुहम्मद ( स. ) म्हणाले असल्याचे उत्तर अबूझर गफ्फारी यांनी दिले. तो ज्यू धावत, विव्हळत त्याच्या क़बील्यात पोचला आणि सर्वांना जमा करून मोठ्या आवाजात दवंडी देऊ लागला... "बंधूंनो! आपल्या हातातील या जगाच्या नेतृत्वाची कमान लौकरच हिसकावली जाणार असून ती आता मुसलमानांच्या हाती येणार आहे. आपल्या भावासाठी देखील तेच पसंत करावे, जे आपण स्वतःसाठी पसंत करतो, असे वागणाऱ्या समूहाच्या हातीच जगाच्या नेतृत्त्वाची कमान असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि ही कमान आता मुसलमानांच्या हाती जाणार असल्याचे तौरेत अणि झुबूरचे भाकीत लौकरच खरे ठरणार आहे आणि ते मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलो आहे.... "
असो. मा. उमर यांनी आपल्या फिरासतचा वा सद्सद्विवेकबुद्धीचा पूर्ण वापर करूनच या सर्वेक्षण समितीच्या अध्यक्षपदी अबूझर गफ्फारी यांना नियुक्त केले, ते यामुळेच की, अबूझर गफ्फारी यांना गोरगरिबांचा प्रचंड कळवळा होता आणि त्यांच्या याच गुणधर्मामुळे प्रेषित मुहम्मद ( स. ) त्यांना सच्चा मुस्लिम असल्याचे म्हणत असे.
झाले, सर्वेक्षण कमेटी गठित झाली आणि काही काळातच खलिफा मा. उमर फारूक यांची निर्घृण हत्या झाली.
प्रश्न निर्माण तर होणारच... ! खलिफा मा. उमर यांची हत्या तर सोडाच, त्यांच्या विषयी साधा कलह देखील कोणाच्याच मनात निर्माण होणे शक्य नव्हते, असा हा काळ होता. मग एवढी मोठी घटना घडतेच कशी ??? ही घटना इस्लामी इतिहासातले सर्वात मोठे रहस्य आणि मर्डर मिस्ट्री असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र आपल्या मोठमोठ्या इतिहासकारांनी सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे भांडवलशाही पातक केले असल्याचा विचार मला व्यथित करतो. कारण मा. उमर फारूक हे जागतिक कीर्तीचे आणि जागतिक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. सारे जग त्यांच्यावर जिवापाड प्रेम करीत होते. त्यांची हत्या म्हणजे जणू पृथ्वी हादरून जाण्यासारखे होते. खरे तर त्यांची हत्या करण्याचा साधा विचार देखील करणे त्या वेळी महापाप समजले जात होते. त्यामुळे त्यांच्या हत्येचे एवढे क्षुल्लक कारण असणे तर शक्यच नाही की, एका माथेफिरू माणसाने केवळ एवढ्यासाठीच त्यांची हत्या करावी की......
या हत्येमागील गूढ शोधण्यासाठी आपल्याला हे पहावे लागणारच की, त्यांच्या हत्येमुळे नेमका फायदा कोणाचा झाला अथवा होणार होता!!! ज्यांचा फायदा झाला, त्यांनीच फेरोझ नावाच्या एका सुपारी किलरला निवडले आणि एक भला मोठा ड्रामा रचला. पडद्यावर हत्यारा कोणीही असो. मात्र पडद्यामागील स्टंट रोल होता, तो भांडवलशाही मुस्लिमांचा..., ज्यांना नमाज पढ़ने, रोज़ा पाळणे आणि सतत हज व उमरे करणे, आणि विशेष म्हणजे वीस वीस रकात तरावीहची नमाज़ पढ़ने अवघड मुळीच नव्हते. अवघड होते, ते फक्त आपल्या संपत्तीत गोरगरीब व गरजूंना वाटा देणे. आणि सुरवातीलाच म्हटलो त्याप्रमाणे धर्म वेगळा व धंदा वेगळा, पैसा कमावण्याच्या आणि तो खर्च करण्याच्या पद्धतीत इस्लामी नियम व कायदा आणायचा नाहीच मुळी, अशी विचारसरणी असलेल्या आणि वैध-अवैध संपत्ती कमावण्यासाठी इस्लामचा सर्रास वापर करणार्या मूठभर भांडवलशाही मुस्लिमांचा हात यात असावा, असेच मनापासुन वाटते.
घडलेही काही असेच...
मा. उमर यांच्या हत्येनंतर अबूझर गफ्फारी काही गुपचूप बसले नाही, बसुही शकत नव्हते. तिसरे खलिफा मा. उस्मान यांच्या काळात मात्र स्वतःला सावरत त्यांनी इस्लामी शासनातील सर्व सम्पत्तीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले. त्यात धक्कादायक तथ्य समोर आलेच. इनमिन तीनचार महिन्यांच्या कालावधीतच काही मूठभर मुसलमानांच्या घरी अमाप संपत्ती सापडली आणि दुसरीकडे मात्र असंख्य जनता दरिद्री असलेली आढळली. या मूठभर मुस्लिमांच्या मोठमोठ्या हवेल्यांत हाती लागलेले सोने-चांदी कुर्हाडीने तोडून तोडून शोधावे लागले. एकेकाचेच दहा दहा वीस वीस आणि पन्नास पन्नास बंगले आणि त्यात पाचपाचशे उंट, काहींची सम्पत्ती दमीश्क आणि कैरो मध्ये देखील आढळली.
यावर अबूझर गफ्फारी यांनी कमिशनचा अहवाल तिसरे खलिफा मा. उस्मान यांच्या दरबारी सादर केला आणि शुन्य प्रहरात जळजळीत भाषण केले, म्हणाले, बंधूंनो!
मी सम्पत्ती वाटप कमेटीचा रीतसर नियुक्त करण्यात आलेला अध्यक्ष आहे. मी सर्व संपत्तीचे सर्वेक्षण केले आणि त्यात धक्कादायक तथ्य समोर आले.
काही मूठभर लोकांकडेच अमाप संपत्ती केंद्रित झाली आणि सामान्य जनता उपासमारीला बळी पडली आहे. हे मी मुळीच खपवून घेणार नाही. याद राखा. जर ही संपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च केली नाही तर कयामतच्या दिवशी याच सोने चांदी इत्यादींनी तुमच्या पार्श्वभागावर चटके दिले जातील ( सूरह - ए - झारियात ) 😠😠😠
पार्लमेंटमधील त्यांचे हे भाषण तत्कालिन मूठभर सत्ताधारी भांडवलशाह मुस्लिमांच्या खूपच जिव्हारी लागले.
खलिफा उमर यांची हत्या तर घडविली, तरीही आपल्यावरील संकट टळले नाही. उलट उमर फारूक यांनी जाताजाता अबूझर गफ्फारींचे तुणतुणे आपल्या मागे लाऊन गेले. त्यांना आपल्यामागे हात धुवून लागण्यासाठी सोडून गेले. यांचा काही तरी बंदोबस्त करावाच लागेल, असा गुपचूप निर्णय झाला. आणि मग त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना देशाबाहेर करून आपला स्वार्थ साधण्याचा मार्ग मोकळा करून घेतला असल्याचे इतिहासात स्पष्ट दिसते.
त्याकाळी बनुउमैयाचे काही लोक चोरवाटेने सत्तेत मोठमोठ्या हुद्द्यावर बसलेले होते आणि त्यांच्याच सल्ल्याने अबूझर गफ्फारी यांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते.
इस्लामी इतिहासात येथूनच सुरुवात झाली ती भांडवलशाही इस्लामची. अर्थात नमाज, रोज़ा, हज, अल्लाहचे नामस्मरण इत्यादी इत्यादी सर्व काही करायला सांगा, ते आम्ही करू, मात्र आमच्या संपत्तीत गोरगरिबांना वाटा देण्याची भाषा कराल तर तुमचा उमर आणि अबूझर गफ्फारी करूया, ही मूक धमकी देण्याची सुरुवात इस्लामी इतिहासात पहिल्यांदाच येथून झाली आणि विशेष म्हणजे हा गुन्हा असल्याचे देखील कोणाच्या लक्षात येऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली.
झाले, संपले...
आता इस्लामच्या नावावर माफियागिरी करायला रान मोकळे झाले. उमर आणि अबूझर हे इस्लामी ग्रंथातील उच्च कोटीच्या व्यक्ती असल्याचे इतिहासात नोंद झाले, मात्र त्यांचा विचार आणि इस्लाममधील मानवाधिकार त्यांच्यासोबतच दफन करण्यात आला. मुळात हा विचार उमर आणि अबूझर गफ्फारी यांचा स्वतःचा नव्हताच. मुळात तो क़ुरआनाचा आदेश आहे. उमर फारूक आणि अबूझर गफ्फारी हे तर क़ुरआनाच्या या आदेशाला कायद्याचे स्वरुप देऊन कयामत पर्यंत सामांन्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा कार्यक्रम आखत होते. मात्र खरोखरच मूठभर लोकांच्या भांडवलशाहीला हे सहन कसे होईल? शेवटी त्यांनी दोघांचा काटा काढूनच दम घेतला....
या कटू वास्तव्यावर शिक्का मारला तो स्वतः प्रेषित मुहम्मद ( स. ) यांनीच! प्रेषितांच्या अनेक भाकितांपैकी एक ऐतिहासिक भाकीत असे की, अबूझर गफ्फारी यांचा मृत्यू इस्लामी शासनाच्या सीमेवर होईल आणि त्यांच्या जनाज़ामध्ये केवळ तीन पुरुष आणि एक महिला असतील आणि मृत्यूपूर्वी ते दूध पीतील.
घडलेही असेच!
इस्लामी शासनाच्या सीमेवर ते आपल्या बायकोसोबत मृत्युशय्येवर होते. त्यांचा दम निघत नव्हता. हे मेले तर मी एकटी यांचा दफनविधी कसा करणार, अशी चिंता त्यांच्या बायकोला भेडसावत होती. "अगं वेडे! मी असा नाही मरणार... तीन जणांचा एक गट येईल आणि त्यांच्याकडचे दूध घेतल्याशिवाय मी मरणार नाही, असे मला प्रेषित मुहम्मद( स. ) यांनी सांगितले. त्यांचे भाकीत खोटे कसे ठरेल?" म्हातार्या बायकोला धीर देत ते म्हणाले. एवढ्यातच दूरवर तीनजण येताना म्हातारीने पाहिले. तिघे प्रवासी जवळ आले, त्यांच्याकडचे दूध अबूझर गफ्फारींनी घेतले, शेवटचा घोट घेताना ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर्रसूलुल्लाह म्हणत त्यांनी प्राण सोडला.
अशा रीतीने प्रेषित मुहम्मदांचे भाकीत खरे ठरले, मात्र क़ुरआनाचा आदेश आजही त्यात सुरक्षित आहे. त्यावर अंमलबजावणी मात्र कधीही होत नाही. इस्लामचा झेंडा सार्या जगात फडकत आहे. त्या झेंड्याचा दांडा देखील खूप भक्कम आहे. मात्र त्या झेंड्याच्या पायाच दिसू शकत नाही. तो न दिसणारा मजबूत दगड म्हणजे इस्लामचा मानवाधिकारांविषयीचा आदेश होय, जो मूठभर भांडवलशाही मुस्लिमांनी कधीचाच दफन करून टाकला.
बिचारे गोरगरीब मुस्लिम पोटात भुकेची आग घेऊन इस्लामला उराशी कवटाळून जगताहेत, आया बहिणी मशिदीसमोर भिक्षा मागताहेत आणि मूठभर भांडवलशाह मुस्लिम आपल्या कारवर लाखो रुपये खर्च करून 786 नंबर मिरवत मशिदीत जुम्माची नमाज पाढायला येऊन त्यांच्या हाती रुपया दोन रुपये देऊन आपण सच्चे मुस्लिम होण्याचा अहंकार मनी घेऊन फिरताहेत...
चालुद्या बाबा...
शेवटी सम्पत्ती तुमची आहे.
आम्ही आमच्या नशिबाने गरीब आहोत...
आम्ही घेऊ आमचा अधिकार हशरच्या मैदानात...
तिथेच आपली गाठभेट होईल...
===== क्रमशः =====


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा